पुणे : उत्सव हॉटेल चौक परिसरात आंदोलनादरम्यान रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनासाठी पोलिसांनी चौक परिसरात शांततेत बसून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र, काही कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रास्ता रोको तसेच इतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) गोवर हसन यांनी दिली.
दरम्यान, आंदोलनस्थळावरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात शांतता कायम असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

