प्राणी संगोपन केंद्राची जेसीबीने तोडफोड केल्याचा आरोप; उष्माघाताने पाळीव कुत्र्याचा मृत्यू, चित्रपट निर्माता आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकासह सात जणांवर गुन्हा
पुणे : अनधिकृतपणे जागेचा ताबा मिळविण्यासाठी माणसांमध्ये संघर्ष, दहशत आणि हत्या झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, जागेच्या वादातून आता मुक्या प्राण्यांच्याही जीवाला धोका निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप पुण्यातील बाणेर परिसरातून समोर आला आहे. प्राणी संगोपन केंद्राची कथित तोडफोड आणि त्यानंतर ‘गोल्डी’ नावाच्या पाळीव कुत्र्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने पुण्यात खळबळ उडाली आहे.
बाणेर-पाषाण लिंक रोडवरील प्राणी निगा, पक्षी प्रशिक्षण आणि डॉग ग्रूमिंग केंद्राचे चालक संदीप महादेव स्वामी यांच्या तक्रारीनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी ते बाहेर असताना जेसीबीच्या सहाय्याने कुत्रे आणि पक्षी ठेवलेला पिंजरा पाडण्यात आला. तसेच प्राण्यांना सावली देणारे झाडही तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तोडफोडीनंतर ‘गोल्डी’ हा पाळीव कुत्रा कडक उन्हात पडलेल्या आवारातच बांधलेला राहिला. त्याच्यावर पशुवैद्यकीय उपचार करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान २ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी मृत्यूचे कारण उष्माघात (Heat Stroke) असल्याचे प्रमाणित केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर ‘जागेचा ताबा मिळविण्यासाठी मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ केला जातोय का?’, असा संतप्त सवाल प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. माणूस असो किंवा मुक्या जीवाचा प्राणी—कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
नामांकित बांधकाम व्यावसायिकासह सात जणांवर गुन्हा
या प्रकरणी बाणेर पोलिसांनी कैलास वाणी, कैवल्य वाणी, शिवराज केदारी, अभिजीत केदारी, अभिषेक केदारी, संगमेश्वर वाळे, जेसीबी चालक आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० मधील कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराने तोडफोड करणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर धमकी देण्यात आल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रत्यक्ष दोषी कोण आहेत, तोडफोडीमागील नेमका उद्देश काय होता आणि ‘गोल्डी’च्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
‘प्राणीही सुरक्षित नाहीत का?’
पुणे शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि जमिनीच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर जागेच्या वादांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, जागेच्या ताब्यासाठी जर मुक्या प्राण्यांच्या निवाऱ्याची तोडफोड होत असेल आणि त्यातून एखाद्या प्राण्याचा जीव जात असेल, तर हा केवळ जागेचा वाद न राहता माणुसकी आणि प्राणी कल्याणाचा गंभीर प्रश्न बनतो, अशी भावना व्यक्त होत आहे.
‘गोल्डी’च्या मृत्यूची घटना ही केवळ एका पाळीव कुत्र्याच्या मृत्यूची घटना म्हणून न पाहता, प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप करीत आहेत. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींवरील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“माणसांसाठी कायदा आहेच; पण मुक्या प्राण्यांच्या जीवाचे रक्षण कोण करणार?”
बाणेरमधील या घटनेने पुणे प्रशासन आणि पोलिसांसमोर हा गंभीर प्रश्न उभा केला आहे. जागेचा ताबा, विकास आणि आर्थिक हितसंबंध यांच्यापेक्षा प्राणी आणि माणसांच्या जीवाची किंमत मोठी आहे का? या प्रश्नाचे उत्तर आता तपासातून आणि प्रशासनाच्या कारवाईतून मिळणे अपेक्षित आहे.

