
भोर- चंद्रकांत जाधव.. जंगल, वन्यजीव आणि अमूल्य नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर वन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ भोर उपवन विभागाच्या वतीने राष्ट्रीय वनशहीद दिन शुक्रवारी (ता.११) साजरा करण्यात आला.
भोलावडे येथील वन उद्यानात असलेल्या वन शहिद सदाशिव त्रंबकअप्पा नागठाणे यांच्या स्तंभाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी शीतल राठोड, भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. वनशहीदांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.
वनसंपत्तीचे रक्षण हे अत्यंत आव्हानात्मक काम असून अनेक कर्मचाऱ्यांनी जंगलांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करताना स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही. त्यांचे हे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील असे वनशहीदांच्या त्यागाचे स्मरण करताना शीतल राठोड यांनी सांगितले. यावेळी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तर वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रामाणिकपणे सेवा बजावण्याची शपथ घेतली. यावेळी भोर उपवन विभागातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर व कर्मचारी उपस्थित होते..

