
भोर- चंद्रकांत जाधव…भोर-निगुडघर मार्गावरील दोन ते तीन ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांमध्ये विकली जाणारी ताडी वाठार ता.भोर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांमध्ये ताडी पिणारे फेकत असल्याने वाठारचे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर या प्लास्टिकच्या मोकळ्या पिशव्या पाळीव जनावरे तसेच वन्यप्राणी खात असल्याने प्राण्यांना धोका निर्माण होत असल्याचे शेतकरी संपत विठ्ठल खाटपे यांनी सांगितले.
दैनंदिन ताडी पिणारे अनेक लोक वाठारच्या परिसरातील ताडी विक्री केंद्रातून ताडी विकत घेऊन वाठार येथील शेती परिसरात बिनधास्तपणे पिण्यासाठी बसत असतात.ताडीच्या मोकळ्या पिशव्या तेथेच शेतात फेकून देतात.दरम्यान या प्लास्टिकच्या पिशव्या पाळीव जनावरे तसेच वन्य प्राणी खात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.तर शेती शेती पिकांमध्ये या पिशव्यांमधील निकृष्ट दर्जाची उर्वरित ताडी मिश्रित होत असल्याने पिकांवर त्याचा परिणाम होऊन पिके रोगाला बळी पडत असतात.वारंवार यासंबंधीचे तक्रार प्रशासनाकडे केली असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आले आहे.
शेती परिसरात अनेकदा पाळीव जनावरे चारताना प्लॅस्टिकच्या मोकळ्या पडलेल्या पिशव्या खाण्याचे प्रकार घडले आहेत.मात्र शेतकऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आल्याने या प्लास्टिकच्या पिशव्या जनावरांच्या तोंडातून बाहेर काढण्यात आल्या.भोर -निगुडघर मार्गावरील संबंधित ताडी विक्रेत्याला प्रशासनाने समज देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संपत खाटपे यांच्यासह इतर शेतकऱ्यांकडून होत आहे.

