
पुणे : गणेशोत्सव म्हटले की आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध देखावे पाहायला मिळतात; मात्र पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि आधुनिक शहर नियोजनाचा सुंदर संगम घडवून आणणारा अनोखा देखावा युवा उद्योजक व अभियंता विजय मोराळे यांनी साकारला आहे. गणेशोत्सवानिमित्त आपल्या इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील कार्यालयात पर्यावरणपूरक गृहसंकुलाचा देखावा उभारून त्यांनी नागरिकांसमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला आहे. गेल्या दशकभरापासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या समूहाने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभारली असून, या अनुभवातून ‘सुंदर शहर, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकास’ ही संकल्पना गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

या देखाव्यात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, निवासी इमारती, बंगले तसेच आधुनिक शहरासाठी आवश्यक विविध घटकांचे आकर्षक लघुरूप साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे विकासासोबत झाडे, हिरवाई आणि स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ‘विकास हवा, पण निसर्गाच्या सोबतीने’ हा संदेश या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार आणि त्यासोबत वाढणारे पर्यावरणीय प्रश्न लक्षात घेता, आधुनिक शहर उभारताना निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी केवळ सजावटीचे कौतुक न करता त्यामागील पर्यावरणपूरक विचार समजून घ्यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक जनजागृती, पर्यावरण संवर्धन आणि सकारात्मक विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे या अभिनव उपक्रमातून दाखवून देण्यात आले आहे. ‘विकास करा; मात्र निसर्गाला सोबत घेऊन करा’ या विचारातून साकारलेल्या या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या देखाव्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्यातून ‘ग्रीन सिटी’चा संदेश; विजय मोराळेंचा अभिनव उपक्रम…

