
दौंड : प्रतिनिधी .. दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लिमिटेडच्या २०२६-२७ या १८ व्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जय अजित पवार प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नी ऋतूजा जय पवार, दौंड शुगरचे संचालक तथा पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल कृष्णराव जगदाळे, त्यांच्या पत्नी डॉ. संगीता जगदाळे-पाटील यांच्यासह चेअरमन जगदीश कदम आणि कारखान्याचे संचालक उपस्थित होते. यानंतर कारखान्याच्या १८ व्या गाळप हंगामाचा गळीत गहाण व मोळी पूजन समारंभही पार पडला. आगामी हंगामासाठी कारखाना प्रशासनाने केलेल्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी बोलताना वीरधवल जगदाळे यांनी सांगितले की, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरघोस पीक घेण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दौंड शुगरकडून आतापर्यंत एफआरपीपेक्षा अधिक दर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इथेनॉलचा पुरवठा कमी करण्यासंदर्भातील निर्णयामुळे खासगी साखर कारखान्यांवर परिणाम होत असून, केंद्र सरकारने याबाबत विचार करून उत्पादित इथेनॉल पूर्णपणे खरेदी करण्याची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, कृषिमंत्र्यांसोबत केलेल्या दौऱ्यादरम्यान दोन-तीन दिवसांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याचे जगदाळे यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याच्या प्रश्नावर विशेष भर देण्यात येत आहे. बंद पडलेल्या कूपनलिका सुरू करण्याबरोबरच नवीन कूपनलिका घेण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागात सध्या २०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पाण्याचे आरक्षणही करण्यात आले आहे.
दौंड शुगरच्या नव्या गाळप हंगामाला सुरुवात झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

