
भोर (चंद्रकांत जाधव) : शेतकरी व नागरिकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आलेली ओझन मशीन सध्या वापराअभावी धूळखात पडली असल्याचे चित्र भोरमध्ये पाहायला मिळत आहे. शासनाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या यंत्राचा अपेक्षित वापर होत नसल्याने सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
ओझन मशीनचा योग्य पद्धतीने वापर करून संबंधितांना त्याचा लाभ मिळणे अपेक्षित असताना ती अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत पडून असल्याचे दिसून येत आहे. देखभाल, दुरुस्ती अथवा नियोजनाच्या अभावामुळे यंत्र धूळखात पडले असल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली यंत्रसामग्री अशीच पडून राहणार असेल, तर शासनाचा निधी खर्च करण्याचा नेमका उद्देश काय, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने या मशीनची पाहणी करून ती कार्यान्वित करावी आणि नागरिकांच्या उपयोगात आणावी, अशी मागणी होत आहे.

