
‘तत्वा शिवाय राजकारण’ (सिध्दांत बिना राजनिती) महात्मा गांधींच्या ७ पापे (7 Sins) पैकी १ होते..- गोपाळदादा तिवारी

पुणे प्रतिनिधी पुणे दि २ आक्टों – केवळ औपचारिकतेतून व जाहीरातांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या सारख्या मूल्यवादी व द्रष्ट्या नेत्यांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी व्यवस्था राबवणे आणि त्यांचे विचार व नैतिक मूल्यांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून त्यांना आदरांजली अर्पण केली ही समाधानाचीच बाब आहे. मात्र, एवढेच पुरेसे नाही. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सत्याग्रह, ग्रामस्वराज्य, नैतिकता या मूल्यांच्या आधारावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात राजेशाही पद्धती न राहता लोकशाहीच्या आधारावर लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, अशी त्यांची भावना होती, हे देखील गोपाळदादा यांनी निदर्शनास आणले.

सध्याच्या काळात लोकशाही मूल्य आणि लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची पायमल्ली होताना दिसून येत आहे. हे प्रकार रोखून महात्मा गांधी यांच्या विचारानुसार आचरण करून त्यांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करणे, राजकारण्यांसह भारताचे नागरिक म्हणून आपले सर्वांचेच कर्तव्य आहे, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान पदाची जबाबदारी घेण्यापूर्वी रेल्वेमंत्री असताना एका रेल्वे अपघातातची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ही बाब सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे अशी अपेक्षाही तिवारी यांनी व्यक्त केली.

