
प्रतिनिधी… पाटस (ता. दौंड) येथील पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या सुमारे ६० लाख रुपयांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निविदा प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा तसेच ठेकेदाराची चुकीची कागदपत्रे वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे शासनाचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे संबंधित ठेकेदाराने आहे. या संपूर्ण प्रकरणाची शासनस्तरावर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुमन नारायण कंट्रक्शनचे कंपनीचे चालक संजय जाधव यांनी केली आहे.
पाटस येथील हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गाने संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पाटस गावातून दौंड रोड मार्गे पुन्हा पुणे सोलापूर मार्गाने पाटस – बारामती संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने बारामती कडे जात असल्याने पालखी सोहळ्यापूर्वी पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी सुमन नारायण कंट्रक्शनने १६ टक्के दराने निविदा भरल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र, संबंधित काम दोन टक्के दराने निविदा भरलेल्या नागेश्वर कंट्रक्शनला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला मिळू शकणाऱ्या अंदाजे दहा लाख रुपयांच्या महसुलाचा तोटा होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुमन नारायण कंट्रक्शनच्या वतीने बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ तसेच ग्रामपंचायत कसबे पाटसच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. या पत्रात पालखी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करून वर्क ऑर्डर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुमन नारायण कंट्रक्शन कंपनीने १६ टक्के दराने निविदा भरली असताना, कंपनीकडून कोणतीही कागदपत्रे न घेता संबंधित काम नागेश्वर कंट्रक्शनला दोन टक्के दराने देण्यात आल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून ई-निविदा रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारदार संजय जाधव यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दीपक बोरवके आणि तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासक इंदुमती शितोळे यांच्या कार्यकाळात या कामाची निविदा १८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी ऑनलाइन करण्यात आली. त्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली झाली. पुढे ग्रामविकास अधिकारी म्हणून भालचंद्र काळे यांनी पदभार स्वीकारला असताना, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांनी टेंडर ओपन करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, आपल्या कंपनीचे कोणतेही कागदपत्र ग्रामपंचायतीला दिले नसताना कंपनीच्या लेटरपॅडचा गैर वापर झाल्याचे आपल्या निदर्शनास आले असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. कंपनीचे लेटरपॅड वापरून प्रशासनाची तसेच आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, पालखी सोहळा पार पडल्यानंतर आता पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्याची गरज काय, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दुरुस्तीच्या कामाच्या नावाखाली मंजूर झालेल्या ६० लाख रुपयांच्या निधीचा योग्य वापर होणार आहे का, निविदा प्रक्रिया नियमानुसार झाली आहे का आणि प्रत्यक्षात कामाची आवश्यकता किती आहे, याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

