
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय; महावितरणने सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
भोर-चंद्रकांत जाधव… भोर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा सुरू असलेला लपंडाव नागरिकांच्या त्रासात भर घालत आहे. दिवसभरातून वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती कामांसह दुकाने, व्यावसायिक आस्थापना, लघुउद्योग आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे.
कधी काही मिनिटांसाठी तर कधी तासन्तास वीज गायब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अचानक वीजपुरवठा खंडित होऊन पुन्हा सुरू होताना कमी-जास्त दाबाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
पावसाळ्यानंतर हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्यास नागरिकांना त्याची पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज बंद होत असल्याने नागरिकांना नियोजन करणे अवघड जात आहे. वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका बसत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही व्यत्यय येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
महावितरणने शहरातील वीजवाहिन्या, रोहित्रे आणि अन्य यंत्रणेची तातडीने तपासणी करून वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा करावा. तसेच नियोजित दुरुस्ती असल्यास त्याची नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी, अशी मागणी भोरकरांकडून होत आहे. वीजपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग असल्याने ‘लपंडाव’ थांबवून सुरळीत वीजपुरवठा करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

