
माणसांमध्ये असूनही जाणवणारे ‘एकटेपण’ चिंतेची बाब… एकटेपणावर मात करण्यासाठी ‘अनुबंध’सारखे आधारगट हवेत – विजया रहाटकर यांचे प्रतिपादन ; उमरजी मदर अँड चाईल्ड केअरतर्फे ‘अनुबंध’ आधारगटाचे उद्घाटन

पुणे : “आजूबाजूला माणसांची खूप गर्दी, सोशल मीडियात सक्रिय असूनही, जाणवणारे ‘एकटेपण’ ही चिंतेची बाब आहे. मनातील दुःख व्यक्त करण्यासाठी आणि आपले म्हणणे समजून घेणारी व्यक्ती शोधण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत दुःखातून गेलेल्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांचे अनुभव ऐकून घेणारे आणि त्यांना भावनिक आधार देणारे व्यासपीठ उभारणे महत्त्वाचे आहे. या एकटेपणावर मात करण्यासाठी ‘अनुबंध’सारखे आधारगट निर्माण व्हायला हवेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

बालेवाडी येथील उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या गर्भहानी व बालवियोग अनुभवलेल्या कुटुंबांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘अनुबंध’ या आधारगटाच्या उद्घाटनाप्रसंगी रहाटकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक, विचारवंत व तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले, डॉ. प्रमोद उमरजी, डॉ. मुक्ता उमरजी, डॉ. चिन्मय उमरजी, डॉ. केतकी उमरजी, सौ. प्रियांका उमरजी आदी उपस्थित होते. ‘वेदनेतून संवेदनेकडे… संवेदनेतून आधाराकडे’ अशी या आधारगटाची मूळ संकल्पना आहे. त्याअंतर्गत ‘उपचारांपलीकडची जबाबदारी – विज्ञान, संवेदना आणि सामाजिक भान’ या विषयावर अच्युत गोडबोले यांचे विशेष व्याख्यान झाले.

विजया रहाटकर म्हणाल्या, “अनेक पालकांना आपल्या मुलाला गमावण्याचे दुःख सहन करावे लागते. अशा कुटुंबांच्या वेदना समाजाला नेहमीच समजतात, असे नाही. त्यांच्याशी नेमके कसे बोलावे, कसे वागावे आणि त्यांना आधार कसा द्यावा, याबाबत समाजात पुरेशी जाणीव नसते. दु:खात असलेल्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचा आदर करणे, ही सामाजिक संवेदनशीलतेची महत्त्वाची कसोटी आहे. सध्या आपल्या आजुबाजूला शेकडो जणांना विविध कारणांनी मानसिक आधाराची गरज असल्याचे दिसते. अशा लोकांना समजून घेण्यासोबतच त्यांचे ऐकण्याची सर्वाधिक गरज आहे. महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, ती कुटुंबाचा आधार असल्याने तिचे आरोग्य उत्तम तर कुटुंब चांगले राहू शकेल.”

अच्युत गोडबोले म्हणाले, “पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती आणि सामाजिक संबंधांमुळे माणसाला सुरक्षिततेची भावना होती; मात्र त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर काही मर्यादा होत्या. औद्योगिकीकरणानंतर माणसाला अधिक स्वातंत्र्य मिळाले, परंतु पारंपरिक सामाजिक आधारव्यवस्था कमकुवत झाल्याने एकटेपणा वाढला. आज सोशल मीडियावर हजारो मित्र असले, तरी मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि अडचणीच्या वेळी आधार घेण्यासाठी जवळची व्यक्ती नाही. गर्दीतही एकटेपणा अनुभवण्याची ही समस्या गंभीर बनत आहे. त्यामुळे व्यक्तींना एकत्र आणणारे आणि परस्पर संवादाला प्रोत्साहन देणारे आधारगट आज पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहेत.”
डॉ. चिन्मय उमरजी यांनी स्वागतपर प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आपल्याकडे आजही गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मात्र तिच्याकडे माणूस म्हणून पाहणे अतिशय गरजेचे आहे. तिच्या मनाचा, भावनेचा विचार व्हायला हवा. बालवियोग झाल्यानंतर महिलेला शारीरिक आधार तर गरजेचा असतोच; पण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तिला सोबतीची किंवा आधाराची अधिक गरज असते. त्याच विचाराने शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या प्रेग्नन्सी अँड इन्फंट लॉस अवेअरनेस (पेल) या उपक्रमाअंतर्गत ‘अनुबंध’ हा आधारगट सुरू केला आहे.”
भारतात दरवर्षी सहा लाखांहून अधिक बाळे पहिल्या वाढदिवसापूर्वीच दगावतात, सुमारे तीन लाख बाळांचा जन्मापूर्वीच मृत्यू होतो, आणि ज्ञात गर्भधारणांपैकी सुमारे दहा ते पंधरा टक्के गर्भधारणा गर्भपातात संपतात. अशा माता आणि कुटुंबांना या मानसिक आघाताला सामोरे जाणे खूप कठीण असते. अशा वेळी समाज म्हणून आपला दृष्टिकोन कसा असावा, कोणते प्रश्न विचारावेत आणि कोणते टाळावेत, याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने समाजातील गर्भहानी, मृत अर्भकजन्म आणि नवजात बाळाचा मृत्यू अनुभवलेल्या कुटुंबांसाठी ‘अनुबंध’ या आधारगटाची स्थापना करण्यात आली.
डॉ. गिरीश कामत, डॉ. वैजयंती पटवर्धन आणि आरोग्य भारतीच्या डॉ. तेजस्विनी भाले-बोरसे यांनी हा उपक्रम औपचारिक स्वरूपात उभा करून शोकग्रस्त कुटुंबांपर्यंत आधार पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. प्रतिबंधात्मक व सामाजिक औषधशास्त्र विषयातील डॉ. काकराणी यांनीही आपले विचार मांडले. स्त्रीरोगतज्ज्ञ व स्तनपान तज्ज्ञ डॉ. मंगला वाणी यांनी स्तनपानासारख्या प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगशास्त्रातील इतर क्षेत्रांतही असे आधारगट असण्याची गरज व्यक्त केली. बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे संस्थापक डॉ. राजेश देशपांडे यांच्यासह डॉ. बबन साळवे, डॉ. बालाजी सदाफुले आणि डॉ. सुधीर निखारे यांनी रुग्णकेंद्रित बहुविद्याशाखीय टीम उभारण्याची आवश्यकता मांडली. उमरजी हॉस्पिटलच्या जनुकशास्त्रज्ञ डॉ. शुभा फडके यांनी संवेदनशील उपचार, अपराधी भावना टाळणे आणि गर्भपाताच्या कारणांबद्दल शास्त्रीय माहिती देण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाला डॉ. प्रमिला पानसरे, डॉ. पद्मनाभन केसकर, डॉ. संभाजी महाडिक, डॉ. राजेश नारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मानसोपचारतज्ज्ञ मानसी देशमुख तसेच जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. दिलीप वाणी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. मिताली पर्वतीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. गौरव नाईक व डॉ. तन्वी असाटी यांनी आभार मानले.

