
वेल्हा (पुणे): वेल्हा तालुक्यातील कोलंबी ग्रामपंचायतीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या ग्रामसेवक श्री. शहाजी चव्हाण यांच्या मुजोर आणि संशयास्पद कारभाराची अखेर पुणे जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश बजरंग भोसले, विंझर यांनी केलेल्या लेखी तक्रारीत, ग्रामसेवक चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या कामात केलेला हलगर्जीपणा, कागदपत्रांमध्ये घोळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली वरवरची चौकशी यावर थेट आक्षेप घेतला होता. या तक्रारीनंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील (भा.प्र.से.) यांनी तात्काळ कारवाई करत आदेश काढला आहे (क्र. जिप/पंचा/आस्था-१६/२०८/२०२६, दि. ८/१०/२०२६)

या आदेशानुसार हवेलीचे गटविकास अधिकारी श्री. शेखर शेलार यांची स्वतंत्र चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, येत्या १५ दिवसात सर्व पुरावे, जबाब आणि कागदपत्रांसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. “स्थानिक पातळीवर तक्रार दाबण्याचा प्रयत्न झाला, पण जिल्हा परिषद CEO ने न्याय दिला. आता ग्रामसेवकाच्या भ्रष्ट कारभाराची पूर्ण पोलखोल होणार आणि सत्य जनतेसमोर येणार,” अशी प्रतिक्रिया तक्रारदार अविनाश भोसले यांनी दिली. आता या फेरचौकशीत ग्रामसेवक दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई होणार का? याकडे संपूर्ण वेल्हा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

