
भोर – (चंद्रकांत जाधव) विसगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर ता.भोर येथे शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यापासून मुतारी आणि शौचालयाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.लहान मुलांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागत असून शाळा परिसरात गवत, वेलीं वाढल्याने विद्यार्थ्यांचा जीवाला धोका असल्याचे समोर येत आहे.दरम्यान गंभीर समस्येकडे संबंधित ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून मुतारीचे बांधकाम करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे स्थानिक नागरिक व पालकांनी सांगितले.

खानापूरला चौथीपर्यंतच्या शाळेत ४० विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र हक्काचे शौचालय आणि मुतारी उपलब्ध नसल्याने चिमुरड्यांना नाईलाजास्तव शाळेच्या बाहेरील मोकळ्या जागेत( उघड्यावर) नैसर्गिक विधीस जावे लागते. ग्रामीण भागात झाडे -झुडपे मोकळ्या परिसरात साप,विंचू किंवा इतर हिंस्र प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत उघड्यावर जाणाऱ्या या निष्पाप विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थानिकांच्या माहितीनुसार शाळेच्या नवीन बांधकामाचे काम सुरू असून मुतारी व शौचालय बांधकामाचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे.नागरिक,शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांनी वारंवार विनंती करूनही ठेकेदाराकडून संथ गतीने काम सुरू आहे.कामाकडे पूर्णपणे पाठ फिरवली जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे असे जयवंत कोंढाळकर,पंकज थोपटे,गिरीश बदक,संकेत थोपटे,रोहन उल्हाळकर या स्थानिकांनी सांगितले.तर एकीकडे शासन ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘हागणदारी मुक्त गाव’ यांसारख्या घोषणा देत असताना दुसरीकडे शासकीय शाळेतील मुलांना उघड्यावर नैसर्गिक विधी करण्यास जावे लागत आहे. ही अत्यंत शरमेची बाब आहे अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे.

तात्काळ शाळेत शौचालय उपलब्ध करणार.. वीसगाव खोऱ्यातील खानापूर शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून संबंधित ठेकेदाराला बांधकामासमवेत शाळेत तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शौचालय तसेच मुतारी बांधण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र संबंधित ठेकेदाराने शौचालय तसेच मुतारी बांधली नाही.ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आलेले असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुढील दोन दिवसात शौचालय,मुतारी तात्पुरत्या स्वरूपात दिली जाईल असे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी सांगितले.

