
आंबवडे – कर्नावड केंद्रातील शिक्षकांचा पुढाकार ; क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात सत्कार
भोर-चंद्रकांत जाधव : ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजीव शंकर केळकर यांना मिळालेली डॉक्टरेट आणि प्रतिष्ठानच्या पर्यावरणपूरक ‘स्टेनलेस स्टील तिरडी व शिकाळे’ उपक्रमाची जागतिक विक्रमासाठी झालेली नोंद यानिमित्त आंबवडे व कर्नावड केंद्रातील शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात हा कार्यक्रम झाला.
आंबवडे व कर्नावड केंद्रातील शाळांना ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक सहकार्य मिळत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, विविध शालेय उपक्रम तसेच गरजेनुसार शाळांना मदत केली जात असल्याने या भागातील शिक्षक व डॉ. केळकर यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. याच भावनेतून दोनही केंद्रांतील शिक्षकांनी एकत्र येऊन सत्कार समारंभाचे आयोजन केले.
“हा गौरव माझा नसून संपूर्ण भोर तालुक्याचा” सत्काराला उत्तर देताना डॉ. राजीव केळकर म्हणाले, “समाजासाठी केलेल्या कामाचे कौतुक शिक्षकांच्या हातून होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि भावनिक बाब आहे. हा गौरव माझ्या एकट्याचा नसून ध्रुव प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, सहकाऱ्यांचा, शिक्षकांचा, ग्रामस्थांचा आणि संपूर्ण भोर तालुक्याचा आहे.”
पर्यावरणपूरक अंत्यविधी उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, “अंत्ययात्रेसाठी लागणाऱ्या पारंपरिक तिरडीसाठी होणारी बांबूची तोड कमी व्हावी आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या उद्देशाने स्टेनलेस स्टील तिरडी व शिकाळे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला. आज भोर तालुक्यातील १६५ ग्रामपंचायती या सुविधेचा वापर करीत आहेत. ग्रामपंचायती, ग्रामस्थ, दाते आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम व्यापक झाला.” या उपक्रमाची जागतिक विक्रमासाठी नोंद झाली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास अंजना वाडकर, विस्तार अधिकारी, आंबवडे बीट; विजयकुमार वाकडे, मुख्याध्यापक, रावडी माध्यमिक विद्यालय; सविता तनपुरे, सभापती, भोर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था; सुरेश वाडकर, सुरेश खोपडे, जयवंत जाधव, सखाराम वाघळकर, शरद दळवी, प्रकाश पारठे, हेमलता कोलते, वर्षा शिनगारे यांच्यासह दोन्ही केंद्रांतील शिक्षक उपस्थित होते.जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर डॉ. राजीव केळकर; शिक्षकांकडून जल्लोषात सन्मान करण्यात आला.

