
दौंड :- प्रतिनिधी २३/९/२०२६.. पावसाने खंड दिल्यामुळे दौंड तालुक्यातील जिरायती भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके अक्षरशः जळून गेली असल्याने पडवी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पीक नुकसानीची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी दौंड तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी व आढावा घेण्या दरम्यान तालुक्याचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात व कृषी व महसूल व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

यावेळी बोलताना कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले, राज्यात पावसात खंड पडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांवर अनेक स्वप्ने रंगवली होती, मात्र निसर्गाच्या संकटामुळे ती धुळीस मिळाली आहेत. ही परिस्थिती मानवनिर्मित नसून निसर्गाचे संकट आहे,” असे त्यांनी सांगितले.
याबाबत शनिवारी राज्यातील दुष्काळाबाबत प्राथमिक सूचना निघणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले असून, त्यानंतर आवश्यक ती मदत शासनाकडून शेतकऱ्यांना करण्यात येईल. केंद्र सरकारकडून मदत मिळेलच, मात्र त्यापूर्वी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत करण्याचा विचार असून, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येईल. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
पिकांची पाहणी करण्यासाठी बांधावर गेल्याशिवाय प्रत्यक्ष परिस्थितीची तीव्रता लक्षात येत नाही. प्रशासनाला पिक विम्याच्या माध्यमातून मुदतपूर्व पीक कापणीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. कर्नाटकच्या धर्तीवर मदत मिळणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी “कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिक मदत दिली जाईल,” असे सांगितले. मुख्यमंत्री केंद्र सरकारशी मदतीबाबत चर्चा करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दौंडचा हा पट्टा पूर्वीपासून जिरायती भाग म्हणून ओळखला जात असून, सध्याच्या संकटात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्न करीत असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

