
ग्राम सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण, वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सहभाग
दौंड : प्रतिनिधी.. MAEER’s विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, लोणी काळभोर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने पडवी येथे आयोजित विशेष निवासी हिवाळी शिबिराची १० ऑक्टोबर २०२६ रोजी नारायणगाव बेट येथे उत्साहात सांगता झाली. या शिबिराची सुरुवात ४ ऑक्टोबर रोजी झाली होती, तर ६ ऑक्टोबर रोजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

MAEER’s MIT शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष व विश्वस्त डॉ. राहुल कराड आणि कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड यांच्या प्रेरणेने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. शिवचरणसिंग गंधार, उपप्राचार्य प्रो. चिन्नासामी आणि NSS कार्यक्रम अधिकारी श्रीमती रीना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव सोनवणे, श्रीमती लीना असवार, सत्यम पाटील, जया देशमुख तसेच इतर प्राध्यापकवर्गाने योगदान दिले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रुग्ण काळजी व्यवस्थापक शंभूदेव फड, उपव्यवस्थापक संदीप लहाने, सहाय्यक व्यवस्थापक सुरेश मुंडे, पडवी गावचे सरपंच नागेश मोरे, उपसरपंच अजय शितोळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी ग्राम सर्वेक्षण, श्रमदान, शालेय आरोग्य कार्यक्रम, अंगणवाडी भेट, वृक्षारोपण, आरोग्य शिक्षण, पथनाट्य आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती असे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविले. या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘Not Me But You – मी नव्हे, तुम्ही’ या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी विकसित करणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण समुदायाच्या आरोग्यविषयक गरजा जाणून घेण्याची आणि समाजसेवेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या शिबिरामुळे महाविद्यालय आणि पडवी ग्रामस्थ यांच्यातील सामाजिक व आरोग्यविषयक सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत झाली. विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

