![]()
३४ शाळांतील ३४ शिक्षक आणि १०२ विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध उपक्रमांचे आयोजन
दौंड : प्रतिनिधी .. दौंड तालुक्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तालुकास्तरीय एकदिवसीय स्काऊट-गाईड संघनायक शिबिर बुधवार (दि. १४ ऑक्टोबर) रोजी पाटस येथील श्री नागेश्वर विद्यालयात उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात दौंड तालुक्यातील ३४ शाळांमधील ३४ शिक्षक आणि १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, सहकार्याची भावना आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नागेश्वर विद्यालय, पाटस येथील स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष नामदेव नाना शितोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शिबिर प्रमुख म्हणून बारामती शहर संस्थेचे सहाय्यक जिल्हा आयुक्त मुसा नबाब सर यांनी काम पाहिले. दौंड तालुका स्काऊट-गाईड समन्वयक तथा विषयतज्ज्ञ सोमनाथ बंड सर आणि दत्तात्रय कुदळे सर यांनीही शिबिरात सहभाग घेतला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, नानगाव येथील शिबिर सहाय्यक तथा दौंड तालुका गाईड कॅप्टन राजश्री दळवी मॅडम आणि उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या श्री भानोबा विद्यालय, कुसेगाव येथील स्काऊटमास्तर दीपक खुडे सर यांनी शिबिर सहाय्यक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दिपाली गावडे मॅडम आणि दत्ता झांबरे यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षणात्मक व उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड चळवळीतील शिस्त, संघभावना आणि नेतृत्वाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पुणे जिल्हा आयुक्त दिलीप नेवसे सर, पुणे जिल्हा स्काऊट संघटक दिगंबर करंडे सर, पुणे जिल्हा गाईड संघटक उषा हिवराळे मॅडम आणि रुपाली आरु यांनी सर्व सहभागी शिक्षक, विद्यार्थी व आयोजकांचे कौतुक केले. नागेश्वर विद्यालयातील आदर्श शिक्षक उत्तम रुपनवर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रमाणपत्र वितरणाने शिबिराची सांगता झाली.

