
भोर- चंद्रकांत जाधव… महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेली महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कृषी मंडलाधिकारी अमोल शेंडे यांनी नेरे ता.भोर येथील शेतकरी महिलांना मार्गदर्शन बुधवार दि.३० करताना केले.

वीसगाव खोऱ्यातील नेेरे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने महिला शेतकरी प्रमाणपत्र योजनेबाबत जनजागृती करण्यात आली.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी हेमंत किरोळकर यांनी महिलांना योजनेची सविस्तर माहिती दिली.यावेळी मार्गदर्शन करताना किरोळकर म्हणाले की शासनाने ‘शेती करणे’ या संकल्पनेची व्याख्या अधिक व्यापक केली असून त्यामध्ये मत्स्यबीज निर्मिती, बियाणे उत्पादन व बीजप्रक्रिया, रेशीम उद्योग तसेच विविध शेतीपूरक व ग्रामीण व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेती व शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महिला शेतकरीप्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया समजावून सांगताना त्यांनी प्रथम अर्ज करणे, त्यानंतर आधार कार्ड व केवायसी नोंदणी करणे, आपण करीत असलेल्या शेतीविषयक व शेतीपूरक कामांची माहिती भरणे आणि अंतिम पडताळणी करून ॲपवर अर्ज सादर करणे. या चार टप्प्यांची माहिती महिलांना दिली.
महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.ग्रामीण भागातील महिलांना शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये अधिकृत ओळख मिळण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.येथील महिला प्रमाणपत्र कॅम्पचे आयोजन केले होते. त्यासाठी कृषी सखी रेश्मा म्हस्के व ग्राम सखी रमल सावले तसेच नवचेतना शेतकरी महिला गट नेरे यांनी मोठे सहकार्य केले..

