![]()
शिरूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गोलेगाव येथील शाखा टपाल कार्यालयात खातेदारांच्या मुदतठेवींच्या (Fixed Deposits) रकमेचा मोठा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट नोंदी आणि बनावट शिक्यांच्या आधारे तब्बल १५ लाख ४४ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.”
“या प्रकरणी ५६ वर्षीय राजेश जबा खुडे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोलेगाव शाखेत कार्यरत असताना राजेश खुडे यांनी रवींद्र थेरुकर, योगिता थेरुकर, मोहन रसाळ आणि पांडुरंग वाखारे यांच्यासह अनेक खातेदारांकडून मुदतठेवीसाठी रोख रक्कम स्वीकारली. रक्कम घेतल्यानंतर खातेदारांना स्वतःच्या हस्ताक्षरात बनावट खाते क्रमांक आणि नोंदी असलेली पासबुके दिली, तसंच त्यावर टपाल कार्यालयाचे अधिकृत शिक्के मारून त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, ही सर्व रक्कम शासकीय खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी हडप केली.”
“खातेदारांना शंका आल्याने त्यांनी टपाल विभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. टपाल विभागाने सखोल तपासणी केली असता हा मोठा घोटाळा समोर आला. यानंतर केडगाव येथील बारामती टपाल विभागाचे सहाय्यक अधीक्षक शंतनू सिंग (वय ४५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.”

