![]()
दौंड : प्रतिनिधी.. बारामती तालुक्यातील सुपा गावात डायमंड हॉटेलच्या बाजूला ‘फन गेम’ या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून जुगार खेळवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाहरुख रज्जाक शेख आणि प्रशांत शरद बारवकर ( दोघेही रा. सुपा, ता. बारामती, जि. पुणे ) यांच्याविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि, १३ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुपा गावातील डायमंड हॉटेलच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. आरोपी मोबाईलवर ‘फन गेम’ नावाचा ऑनलाइन गेम खेळत असल्याचे आढळून आले. या गेममध्ये पैसे पाठवल्यानंतर संबंधित आयडीवर पॉइंट्स पाठवून जुगार खेळवला जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचा एक आणि १७ हजार रुपये किमतीचा दुसरा, असे दोन निळ्या रंगाचे मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३२ हजार रुपये आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निहाल बापू वणवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार साळुंके (बक्कल क्रमांक २१८७) करीत आहेत.

