
आई-वडील आणि आजी-आजोबांसाठी विशेष उपक्रम; फूड कार्निव्हलचे आयोजन

पुणे : फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटल यांच्या वतीने ‘वर्ल्ड हार्ट हेल्थ चेकअप’ आणि कौटुंबिक दिवसाचे औचित्य साधून आई-वडील तसेच आजी-आजोबांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कौटुंबिक सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेला फूड कार्निव्हल. या उपक्रमामुळे हॉस्पिटलमधील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र येत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे व्यवसाय प्रमुख सिद्धार्थ जोंधळे, ऑपरेशन हेड निलेश शिंदे, एचआर प्रमुख स्नेहा गायकवाड, डॉ. रूपा शर्मा, डॉ. आचल मॅडम यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी व स्टाफ मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
आरोग्याविषयी जागरूकता, कौटुंबिक जिव्हाळा आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

