
भोर-चंद्रकांत जाधव..गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भोर शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत असून, वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येणारी वाहने आणि वाढती गर्दी यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गणेशोत्सव काळात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढत असून, अनेक वेळा वाहतूक संथगतीने सुरू राहते. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात आहे.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध नागरिकांना बसत आहे. शाळा-महाविद्यालयीन वेळेत रस्त्यांवर होणारी गर्दी आणि कोंडीमुळे विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर वृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडताना तसेच बाजारपेठेतून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, दुचाकीस्वार आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी प्रमुख चौकांमध्ये नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवावा, अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन करून बाजारपेठेतील कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

