
पुणे – आपल्या देशाला ११,००० किलोमीटरहून अधिक लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे, ज्यामध्ये अनेक तलाव, जलाशय, धरणे आणि नद्या समाविष्ट आणि जी आपल्या देशातील अथांग लोकसंख्येसाठी जीवनवाहिनी आहेत. पाण्याच्यासारख्या मौल्यवान आणि अमूल्य नैसर्गिक स्रोताची नियमित आणि वेळोवेळी काळजी घेणे तसेच देखरेख करणे अत्यंत आवश्यक आहे याच विचाराने प्रेरित होऊन पुण्यातील डीआरडीओचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आलोक मुखर्जी आणि एनआयओच्या निवृत्त माजी वैज्ञानिक संजीव अफझलपूरकर आणि त्यांचे सहकारी जहाज उत्पादन तज्ज्ञ सनी सेबॅस्टियन, मानवरहित इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीचे तज्ज्ञ राजा महबूबानी, औद्योगिक डिझाइन तज्ज्ञ प्रकाश खानजोडे यांच्या अथक प्रयत्नातून एका नावीन्यपूर्ण स्टार्टअपच्या माध्यमातून जलसंपत्ती व्यवस्थापन, किनाऱ्यावरील ऊर्जा, जलसंशोधन, समुद्रकिनारा आणि अंतर्गत जलमार्गाच्या सुरक्षेसाठी तसेच जलवाहतूक क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले असून अत्याधुनिक मानवरहित पृष्ठभाग व पाण्याखालील वाहने (Unmanned Surface & Underwater Vehicles) आणि सेन्सर्स विकसित केले जात आहेत. त्यांनी मानवरहित आणि स्वायत्त प्रणाली किंवा बोटी, पाण्याखालील रोबोट्स किंवा ड्रोन आणि स्थिर मॉनिटरिंग बॉईज (static monitoring buoys) विकसित केले आहेत. हरित तंत्रज्ञान, जलवाहतूक आणि वैज्ञानिक डेटा संकलनावर भर दिला असून या स्टार्टअपचे प्रत्येक उत्पादन १००% स्वदेशी असून, ते ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पतेला बळ देणारे असल्याचे आलोक मुखर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धरणांची सुरक्षा, जलकुंभाच्या देखभालीसाठी मानवरहित वाहने, जहाजाच्या तळाची तपासणी आणि धरणाच्या सुरक्षिततेसाठी, हवामानाचा अचूक अंदाज देणारे जीवरक्षक ‘स्मार्ट बॉईज’ (Smart Buoys) विकसित करण्याचे सध्या काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणेकरांसाठी खास पर्यटनासाठी स्वायत्त इलेक्ट्रिक बोटी देखील या मध्ये सामील आहेत. भीमा नदीजवळ या प्रकल्पासाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र उभारण्यात आले असून शाश्वत जल व्यवस्थापनासाठी एआय (AI) आणि बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर करून एकात्मिक प्रणाली तयार करण्याचे या सर्व निवृत्त शास्त्रज्ञांचे ध्येय आहे. आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताच्या सागरी क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्यास आम्ही तयार असल्याचे आलोक मुखर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

स्वदेशी स्टार्ट-अप मागची संकल्पना आणि ध्येय.
पुण्यातील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी एकत्र येऊन पर्यावरण आणि पाण्यासारख्या अमूल्य नैसर्गिक स्रोताची जपणूक सुलभ व्हावी, यासाठी व्यासपीठे (platforms) आणि प्रणाली विकसित करण्याचे उद्दिष्टाने कार्य सुरू केले आहे. आहे. या विकसित प्रणालींचा उपयोग शांत तलाव, वाहत्या नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवरील पाण्याचे प्रमाण आणि गुणवत्ता मोजण्यासाठी, पाण्याखालील ड्रोनचा वापर करणे, पुलांचे खांब (piers) यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी, जहाजाच्या तळाची (hull) तपासणी करण्यासाठी, पेट्रोलियम उद्योगातील ऑफशोअर ड्रिलिंग रिगसाठी आणि भारतीय नौदलासाठी पाण्याखालील पाळत ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
कंपनीने इलेक्ट्रिक प्रोपल्शन (विद्युत ऊर्जेवर चालणारी यंत्रणा) वापरून चालणाऱ्या कॅनू (canoes), वॉटर स्कूटर आणि जेट स्की यांसारख्या अनेक बोटी आणि त्यांचे विविध प्रकार देखील डिझाइन आणि विकसित केले आहेत, ज्यामुळे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण सुनिश्चित होते. ही व्यासपीठे हरित ऊर्जेचा वापर करणाऱ्या प्रणाली उपलब्ध करून देऊन पर्यटन उद्योगात क्रांती घडवून आणतील आणि पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव ठरतील. ही व्यासपीठे पक्षीप्रेमी, जलसंधारणवादी आणि जलस्रोत व किनारपट्टीच्या भागाचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील; ज्याचा वापर मत्स्यपालन (aquaculture), खारफुटी (mangrove) जतन, पाण्याखालील वनस्पती आणि प्राणी संशोधन तसेच पाण्याखालील पुरातत्वशास्त्रासारख्या (underwater archaeology) विविध उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो.
या स्वदेशी स्टार्ट-अप च्या संस्थापकांना लष्करात रोबोटिक्स जसे की ROV – दक्ष, UAV – नेत्रा आणि स्वायत्त पाण्याखालील वाहने (AUV) – माया विकसित करण्याचा पूर्वानुभव आहे. पर्यावरण निरीक्षण, संवर्धन आणि शाश्वत हीच त्यांची मुख्य प्रेरणा असून, त्यांनी ‘आत्मनिर्भरता’ आणि आपल्या देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या भावनेला पुढे नेण्यासाठी या अत्याधुनिक प्रणाली पूर्णपणे देशांतर्गत (स्वदेशी) विकसित केल्या आहेत.
अल्प परिचय – आलोक मुखर्जी – डीआरडीओ (DRDO) चे निवृत्त वैज्ञानिक ‘जी’, ज्यांनी लष्करात ‘दक्ष’ (Daksh) नावाचे रोबोटिक वाहन आणि ‘नेत्र’ (Netra) ड्रोन विकसित केले आहे.
संजीव अफझलपूरकर – एनआयओ (NIO) चे प्रतिष्ठित वैज्ञानिक ‘एफ’, ज्यांनी देशातील पहिले स्वायत्त पाण्याखालील वाहन ‘माया’ (Maya) विकसित केले आहे.
सनी सेबॅस्टियन – बोट उत्पादनाचा ३५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले तज्ज्ञ.
राजा महबूबानी – आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि मानवरहित इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीचे तज्ज्ञ.
प्रकाश खानजोडे – २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले औद्योगिक डिझाइन तज्ज्ञ.

