
मुंबई, २८ सप्टेंबर २०२६: पुणेस्थित राष्ट्रीय विमा अकादमीने मुंबईतील कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे सोमवारी “भारतीय विमा परिसंस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम क्वांटम सज्जता” या विषयावर २२ व्या विमा शिखर संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनात विमा क्षेत्र, केंद्र सरकार, वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम संगणनाच्या वाढत्या वापराचा भारतीय विमा क्षेत्रावर होणारा परिणाम, तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम संगणनाच्या क्षेत्रात वेगाने होत असलेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे वित्तीय आणि विमा क्षेत्रासमोर नव्या संधी निर्माण होत असताना काही नवीन जोखमीही समोर येत आहेत. सायबर सुरक्षा, माहितीच्या सुरक्षिततेसाठी वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक प्रणालींची भविष्यातील सुरक्षितता, माहिती संरक्षण आणि विमाधारकांचा दीर्घकालीन विश्वास यांसह उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी विमा संस्थांनी स्वतःची सज्जता कशी वाढवावी, यावर संमेलनात सविस्तर चर्चा झाली.

राष्ट्रीय विमा अकादमीचे संचालक श्री. बी. सी. पटनाईक म्हणाले, “उदयोन्मुख संशोधन आणि जगभरातील तंत्रज्ञानविषयक घडामोडींना भारतीय विमा क्षेत्रातील व्यावहारिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश होता. उदयोन्मुख जोखमी समजून घेणे आणि क्वांटम सज्जता, सायबर सुरक्षा सक्षमतेसह तंत्रज्ञानविषयक तयारीसाठी दीर्घकालीन मार्गनकाशा तयार करण्यावर या चर्चांचा भर होता.”
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. देबाशीष प्रस्ती म्हणाले, “केवळ टप्प्याटप्प्याने किंवा किरकोळ उपाययोजना करण्याची वेळ आता संपली आहे. क्वांटम तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या सायबर सुरक्षा सक्षमतेसाठी आपल्याला सक्रिय, सर्वसमावेशक आणि सहकार्यावर आधारित दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.”
तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत मानवी देखरेख आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करताना आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. कल्याणरामन राजारामन म्हणाले, “तंत्रज्ञान व्यवहार पूर्ण करते, अल्गोरिदम जोखमीचे मूल्यांकन करतात आणि डिजिटल व्यासपीठांद्वारे सेवा दिल्या जातात; मात्र विश्वास, उत्तरदायित्व आणि निर्णयक्षमता ही मानवी मूल्येच केंद्रस्थानी राहिली पाहिजेत.”
संमेलनातील चर्चेचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे “क्यू-डे” ही संकल्पना होती. भविष्यात पुरेशा क्षमतेचे क्वांटम संगणक विकसित झाल्यास सध्या डिजिटल माहितीचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही सांकेतिक सुरक्षा प्रणालींना धोका निर्माण होऊ शकतो. विमा संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक, आर्थिक आणि विमा पॉलिसींशी संबंधित संवेदनशील माहिती असते. त्यामुळे क्वांटम संगणनामुळे माहितीची सुरक्षितता आणि सध्याच्या कूटबद्धीकरण प्रणालींवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा संमेलनात आढावा घेण्यात आला.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात विमा, सरकार आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले. यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. कल्याणरामन राजारामन, भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. देबाशीष प्रस्ती, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आर. चंदर, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय जोशी, एआयसी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. लावण्या आर. मुंडयूर आणि राष्ट्रीय विमा अकादमी, पुणेचे संचालक श्री. बी. सी. पटनाईक यांचा समावेश होता.
यावेळी “न्यू फ्रंटियर्स: एआय प्लस क्वांटम टेक्नॉलॉजी – भारतासाठी विमा क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करणे” या विषयावरील श्वेतपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यांचा विमा क्षेत्राशी वाढता संबंध, तसेच तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर संस्थांनी लक्ष देण्याची गरज असलेल्या विविध बाबींचा या श्वेतपत्रिकेत आढावा घेण्यात आला आहे.
दिवसभर चाललेल्या या संमेलनात तीन उच्चस्तरीय परिसंवाद आणि एका विशेष मार्गदर्शन सत्राचा समावेश होता. क्वांटम तंत्रज्ञानाच्या युगासाठी विमा क्षेत्राची सज्जता, विमा क्षेत्रातील विविध टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम संगणनाचा संभाव्य वापर, तसेच सायबर सुरक्षा सक्षम करण्यासाठी क्वांटमनंतरच्या कूटबद्धीकरणाचे महत्त्व या विषयांवर चर्चा झाली.
क्वांटम सज्जतेवरील चर्चेत भविष्यातील क्वांटम संगणन क्षमतेमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या जोखमी आणि संस्थांच्या दीर्घकालीन नियोजनात तंत्रज्ञानविषयक सज्जतेचा समावेश करण्याची गरज यावर भर देण्यात आला. अन्य एका सत्रात विमा क्षेत्रातील विविध कार्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम संगणनाच्या संभाव्य वापरासोबतच या उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित संधी आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली.
सायबर सुरक्षा हा संमेलनातील चर्चेचा महत्त्वाचा भाग होता. विशेषतः क्वांटमनंतरच्या कूटबद्धीकरणावर चर्चा करण्यात आली. क्वांटम संगणकांच्या संभाव्य हल्ल्यांपासून माहितीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात येणाऱ्या कूटबद्धीकरण पद्धतींचा यामध्ये समावेश होतो. संवेदनशील आर्थिक आणि वैयक्तिक माहिती हाताळणाऱ्या संस्थांसाठी अशा क्वांटम-प्रतिरोधक सुरक्षा उपाययोजनांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
“विमा व्यवसायातील क्वांटम लाभ” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र ऑस्ट्रेलियातील आयजेनसिस्टम्सचे क्वांटम शिक्षण प्रमुख श्री. रमेश नागराजन यांनी घेतले. या सत्रात क्वांटम संगणनाची मूलभूत संकल्पना आणि विमा क्षेत्रातील संभाव्य व्यावसायिक उपयोगांबाबत चर्चा करण्यात आली.
संमेलनात राष्ट्रीय क्वांटम अभियानाच्या कार्यबलाचे सदस्य प्रा. अजय सिंह, आयआयआयटी हैदराबादचे संचालक डॉ. संदीप शुक्ला, सायबर सुरक्षा उत्कृष्टता केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम बिरुडावोलू, भारती अॅक्सा लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराग राजा, गाइडवायर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहम्मद अनझी, डीआयएटी-डीआरडीओच्या डॉ. मनीषा जे. नेने, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तथा मुख्य महाव्यवस्थापक श्री. जोसेफ जोशी सी. जे. आणि सायबर सुरक्षा व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील उद्योजक कर्नल गौरव कुमार उपाध्याय (निवृत्त) यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
या संमेलनाला ३०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी, विमागणित तज्ज्ञ, नियामक, विमा कंपन्या, पुनर्विमा कंपन्या, विमा मध्यस्थ, विमा तंत्रज्ञान आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, राष्ट्रीय विमा अकादमीचे प्राध्यापक व विद्यार्थी आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता.
संमेलनातील चर्चांमधून समोर आलेल्या प्रमुख निरीक्षणे, शिफारसी आणि भविष्यातील प्राधान्यक्रमांचा समावेश असलेले संमेलनानंतरचे उद्योगविषयक माहितीपत्रक तयार करण्यात येणार आहे.

