
भोर-चंद्रकांत जाधव… गणरायाच्या आगमनाने भोर शहर व ग्रामीण भागात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, विविध गणेशोत्सव मंडळांकडून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत भोर शहरातील जय हनुमान गणेशोत्सव मंडळ, भेलकेवाडी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि. १६ सप्टेंबर रोजी अक्षय ब्लड बँक सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे ५२ रक्तपिशव्यांचे संकलन केले. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी अक्षय ब्लड बँकेच्या डॉ. प्रति मॅडम व त्यांच्या सहकारी डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले.
जय हनुमान गणेशोत्सव मंडळाला शहरातील जुन्या व मानाच्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक मानले जाते. मंडळाची स्थापना सुमारे शंभर वर्षांपूर्वी झाल्याचे जाणकार सांगतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळाच्या गणरायाची मिरवणुकीतून विसर्जन सोहळा पार पडतो.
धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मंडळाने राबविलेल्या रक्तदान उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

