
आयशर टेम्पो चालकाचा मृत्यू, कंटेनर डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूला आल्याने टेम्पोची जोरदार धडक ; दोन ते तीन तास वाहतुकीचा खोळंबा

दौंड : प्रतिनिधी..(ता. दौंड) पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनर आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना बुधवारी दि. १४ सकाळी सात च्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूरच्या दिशेने जाणारा कंटेनर महामार्गावरील डिव्हायडर ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आला. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोची कंटेनरला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने कंटेनरच्या पत्र्याचे तुकडे महामार्गावर मोठ्या प्रमाणात विखुरले होते. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तब्बल दोन ते तीन तास वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी आहे.
दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी टोल प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी प्रयत्न केले. रस्त्यावर विखुरलेले पत्र्याचे तुकडे बाजूला करून वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. कंटेनर डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर कसा आला, तसेच हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यवत पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

