
पुणे : प्रतिनिधी.. सरहद लॉ स्कूल, पुणे येथील विद्यार्थ्यांनी फौजदारी न्यायव्यवस्था, कारागृह प्रशासन आणि सुधारात्मक संस्थांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने येरवडा मध्यवर्ती कारागृहाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कायद्याच्या पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष न्यायव्यवस्थेचे कार्य समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कारागृह प्रशासन, न्यायप्रक्रिया, शिस्त, कायदेविषयक जागरूकता तसेच कैद्यांच्या पुनर्वसनाचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली.

या शैक्षणिक भेटीदरम्यान सहाय्यक प्राध्यापक स्वाती डिंबर, ग्रंथपाल मनीषा जगताप, सुनीता शिंदे, ॲड. सागर घोलवे, ॲड. शिवम पोतदार आणि सहाय्यक प्राध्यापक अशोक बडे यांनी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन केले. या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य व प्रोत्साहन दिल्याबद्दल सरहद लॉ स्कूलच्या वतीने श्री. अभय नहार, श्री. अनूज नहार (विश्वस्त, सरहद) आणि प्राचार्य डॉ. सत्यवती राजेश खळदकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि भविष्यातील जबाबदार व संवेदनशील कायदेतज्ज्ञ घडावेत, या उद्देशाने सरहद लॉ स्कूलतर्फे अशा शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. सरहद लॉ स्कूल, पुणे हे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबत व्यावहारिक अनुभव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

