
बारामती : प्रतिनिधी..घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला बारामती बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे. जयपाल लखन पवार (वय ४१, रा. निरावाघज फाटा, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने, असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ब) आणि ३३१ (३) प्रमाणे घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बारामती परिसरातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळ, गुन्हा घडण्याची वेळ आणि आरोपीची कार्यपद्धती यांचा अभ्यास करून तपास सुरू केला. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित घरफोडी जयपाल पवार हिने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच ती बारामती बसस्थानक परिसरातून साताऱ्याला जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांनी बसस्थानक परिसरात शोध घेऊन जयपाल पवार हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याकडून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने, असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोसले तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार शिवाजी निकम, सचिन होळकर, स्वप्नील अहिवळे, पोपट नाळे, किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, गणेश डेर, रहिस मुलानी आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार देवकाते यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

