
भोर-चंद्रकांत जाधव) : स्थानिक पातळीवर उत्पादन वाढीसह लघुउद्योजक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना व्यवसायासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व्यापारी गाळे उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार थोपटे बुधवार (दि.३०) बोलत होते.यावेळी जि. प. सदस्य पोपट सुके,पं.स.सदस्य रोहन बाठे, नगराध्यक्ष ॲड.जयश्री शिंदे,माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार,चेअरमन सोमनाथ सोमानी,व्हा.चेअरमन संपत दरेकर,संचालक अतुल किंद्रे,अतुल शेडगे,विजय शिरवले,नरेश चव्हाण,किशोर बांदल,नंदा मोरे,मधुकर कानडे,सुजाता जेधे,प्रावीण शिंदे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, नव्या व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच परिसरातील आर्थिक उलाढाल वाढावी, यासाठी व्यापारी गाळ्यांची उभारणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येणार असून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला. व्यापारी गाळ्यांमुळे विविध व्यवसायांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होऊन परिसरातील व्यापाराला गती मिळणार आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि उत्पादकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने हे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्याबरोबरच उत्पादन, व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे थोपटे यांनी स्पष्ट केले.

