
चंद्रकांत जाधव… भोर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या शहरासह १३८ गावांमध्ये सार्वजनिक २६८ तर घरगुती ३ हजार ६०८ श्रींच्या मूर्तीं वीराजमान झाल्या होत्या.यातील दीड दिवसांनी घरगुती २००,सहाव्या दिवशी सार्वजनिक मंडळाचे २५० तर घरोघरच्या ३ हजार ४०८ तर बाप्पांचे पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.दरम्यान गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला च्या जयघोषाने तालुका दुमदुमून गेला होता.

भोर शहरात नगरपरिषदेकडून घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी हौद मांडण्यात आले होते.तर निर्मल्यासाठी सोय करण्यात आली होती. विसर्जन स्थळी नगरपालिकेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.ग्रामीण भागात सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पांचे विहिरी,कालव्यात विसर्जन केले गेले.डीजे ऐवजी यावेळी ढोल ताशांच्या खेळांना महत्त्व दिले गेले होते.शहरातील सार्वजनिक अनेक मंडळांनी सकाळी दोन वाजण्याच्या आत तर काही मानाच्या ८ ते१० गणपती मंडळांनी नगरपालिका चौकापासून रांगा लावून जल्लोष करीत मूर्तींचे नीरा नदीपत्रातील शनिघाट व बसरापूर येथील धरण क्षेत्रात रात्री उशिरा प्रशासकीय नियमानुसार विसर्जन केले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर भोर पोलिसांकडून ५ अधिकारी, ४० कर्मचारी व होमगार्ड २५ तैनात करण्यात आले होते.प्रांताधिकारी डॉ.विकास खरात,तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे,पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या आवाहनानुसार गणेश भक्तांनी नियमांचे उल्लंघन न करता बाप्पांचे उत्साहात विसर्जन केले.

