
भोर-चंद्रकांत जाधव…पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भोर तालुक्यातील कारी – उत्रौली जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींनी आवश्यक पाणीपुरवठा कामांचे मागणीपत्र तातडीने सादर करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरूपा थोपटे यांनी केले आहे.

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नवीन बोअरवेल घेणे, बोअरवेलची विशेष दुरुस्ती करणे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील विहीर खोलीकरण अथवा गाळ काढणे, नळपाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती तसेच वाडी – वस्त्यांसाठी तात्पुरती नळपाणी पुरवठा योजना आदी कामांचा समावेश आहे.

कारी – उत्रौली जिल्हा परिषद गटातील ज्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठ्या विषयी संबंधित कामांची आवश्यकता आहे, त्यांनी मुदतीपूर्वी प्रस्ताव सादर करावेत या आवश्यक कामांची मागणीपत्र बुधवार (दि. ३०) पर्यंत भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषद संपर्क कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी केले आहे.

