
भोर-चंद्रकांत जाधव.. भोर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत पै. दर्शना म्हस्के हिने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कुस्ती कौशल्याची दमदार छाप उमटवली. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची आगामी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दर्शना म्हस्के हिने स्पर्धेत आक्रमक व आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. सलग तीन वर्षे तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी तिच्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि मेहनतीचे द्योतक ठरली आहे.
यावेळी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार ,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, राहुल शेटे ,राजेंद्र वरे, सुनील शेटे, चंद्रकांत पारवे, चंद्रकांत नांगरे यांनी यशाबद्दल पै. दर्शना म्हस्के हिचा गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. तिच्या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, शिक्षक, पालक तसेच मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेतही दर्शना म्हस्के उत्कृष्ट कामगिरी करून भोर तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

