
भोर (चंद्रकांत जाधव).. भोर शहरातील पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले झाड वाळवी लागल्यामुळे धोकादायक बनले असून, हे झाड तलाठी कार्यालयाच्या इमारतीवर झुकले आहे. झाडाच्या फांद्याही अस्ताव्यस्त वाढल्या असून, हे झाड कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य धोक्याकडे भोर नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार संघ भोर व शहरातील सुज्ञ नागरिकांच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी भोर नगरपालिकेच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या परिसरात पंचायत समिती, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच जिजामाता शाळा असल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी धोकादायक झाड असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडाच्या फांद्या तोडण्याबाबत नगरपालिकेकडे वारंवार लेखी अर्ज तसेच तोंडी विनंत्या करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून विविध कारणे सांगून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. एकीकडे धोकादायक झाडाच्या फांद्या तोडण्याबाबत दुर्लक्ष होत असताना, दुसरीकडे अनावश्यक ठिकाणी वृक्षतोड केली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संभाव्य दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित करत संबंधित झाडाची तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच नगरपालिकेने या समस्येची दखल घ्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात शहरातील पत्रकार आणि सुज्ञ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार संघ भोरच्या वतीने करण्यात आले आहे.

