
वादळी पावसाने उभी पिके आडवी, कुठे दिलासा तर कुठे शेतीचे नुकसान
दौंड : प्रतिनिधी… पावसाळ्याचे दिवस संपत आले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या दौंड तालुक्यात सोमवारी (दि. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग जलमय झाले.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अल्प पाण्यावर जगवलेल्या पिकांना पावसाचे पाणी मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाचा काही शेतकऱ्यांना फटकाही बसला. काही ठिकाणी उभी पिके आडवी होऊन जमीनदोस्त झाली असून, धान्य व शेतमालाचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. शेतात पाणी साचल्याने काही पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला. वन्यजीव व पशुधनासाठीही हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

