
दौंड प्रतिनिधी :- अक्षय देवडे…… दौंड तालुक्यातील पडवी गावच्या हद्दीतील पडवी-सुपे मार्गावरील सुपे घाटात अपघातांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास मालवाहतूक पिकअप वाहनाचा अपघात झाला. याच ठिकाणी अवघ्या काही तासांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी होऊन मोठा अपघात झाला होता. त्यामुळे सुपे घाटातील धोकादायक पहिले वळण प्रवासी, विद्यार्थी, भाविक आणि वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे चित्र आहे.
पडवी ते सुपे हा अष्टविनायक महामार्ग असून, या मार्गावर सुपे घाटातील पहिले वळण अत्यंत अवघड आहे. या वळणावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, वळणाचा अंदाज न आल्याने अथवा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. .
बुधवारी दि १६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बारामती तालुक्यातील सुपे येथे मोठे शैक्षणिक संकुल असल्याने परिसरातील पालकांचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुपे येथे पाठविण्याकडे कल आहे. त्यामुळे या मार्गावर शालेय बस व इतर विद्यार्थी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच अष्टविनायक यात्रेतील मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते.
याशिवाय हा मार्ग अष्टविनायक महामार्ग असल्याने शिरूर-सातारा तसेच परिसरातील मालवाहतूक करणारी अवजड व इतर वाहनेही या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे सुपे घाटातील पहिले वळण सर्व प्रकारच्या वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे.
या ठिकाणी वारंवार अपघात होत असताना संबंधित प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुपे घाटातील पहिले धोकादायक वळण शक्य तितक्या लवकर सुधारून तेथील अपघाताचा धोका कमी करावा, अशी मागणी भाविक, प्रवासी, वाहनचालक तसेच परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आणखी किती अपघातांची प्रशासन वाट पाहणार? असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

